इराण आणि इस्रायलनं संपूर्ण युद्धबंदीबाबत सहमती दर्शविली असून, येत्या काही तासांत ती लागू होईल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री केली. कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळावर इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर काही वेळातच ही घोषणा करण्यात आली. युद्धबंदी टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल. इराण युद्धबंदी सुरू करेल, त्यानंतर इस्रायल 12 व्या तासाला युद्धबंदी करेल आणि त्यानंतर 12 दिवसांच्या युद्धाची अधिकृत समाप्ती होईल, असं ट्रम्प यांनी निवेदनात म्हटलं आहे.
दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इस्राईलसोबत युद्धबंदीबाबत कोणताही करार झाल्याचे नाकारलं आहे. इस्रायलनं हल्ले थांबवले, तर इराणही हल्ले थांबवेल, असं अराघची यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
इराणच्या फार्स न्यूज एजन्सीनं, ट्रम्प यांनी प्रस्तावित केलेली युद्धबंदी योजना पूर्णपणे खोटी आहे आणि ती जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी होती. इराणला युद्धबंदीसाठी कोणताही अधिकृत किंवा अनधिकृत प्रस्ताव मिळालेला नाही, असं म्हटलं आहे.