इराण आणि इस्रायलमध्ये अद्याप संघर्ष सुरु आहे. अमेरिकेनं काल इराणवर हल्ला केल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलवर हल्ले सुरु ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. इस्रायलनं मोठी चूक केली असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
इराणच्या संसदेनं फोर्डो, नटान्झ आणि इस्फहान इथल्या इराणी अणुआस्थापनांवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात महत्त्वाचा तेल आणि वायू वाहतूक मार्ग असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव एकमतानं मंजूर केला आहे. या मार्गावरची सागरी वाहतुक बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा अंतिम अधिकार इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडे आहे.
या परिषदेनं अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी या निर्णयामुळे जागतिक स्तरावर तेलाची किंमत प्रति बॅरल शंभर डॉलर्सच्या वर जाऊ शकते. दरम्यान, अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने या भागात लष्करी दल तैनात केलं आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघचित आज रशियाला पोहोचले. अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. इराणमध्ये सत्ता बदलण्याची शक्यता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली आहे. ऑस्ट्रेलियन परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांनी इराणवर हल्ला करण्याच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.