इराणनं कतारमधील अल उदेद हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. हा अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वांत मोठा लष्करी तळ आहे. इराकमधील ऐन अल-असद तळावरदेखील इराणनं हल्ला केल्याचं वृत्त आहे.
कतारमधील अमेरिकेचा हवाईतळ सावधगिरीचा उपाय म्हणून आधीच रिकामा करण्यात आला होता आणि त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालींनी येणाऱ्या क्षेपणास्त्रांना यशस्वीरित्या रोखल्यानं या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असं कतार आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
या संकटामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला असून, एअर इंडियाने पश्चिम आशियातील सर्व उड्डाणे तत्काळ स्थगित करण्याची घोषणा केली आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, कतारमधील भारतीय दूतावासाने सावधगिरीच्या सूचना जारी केल्या असून, भारतीयांना घरात राहण्याचा आणि कतारच्या अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.