आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यभरातही विविध ठिकाणी योग प्रात्यक्षिकं होणार आहेत. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी योग ही एक जीवनशैली आहे असं सांगत योगाभ्यासाचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचं आवाहन केलं आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या उद्या पुण्यात मुक्कामी आहेत. यानिमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने भव्य वारकरी भक्तीयोग उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या उपक्रमात वारकरी, विद्यार्थी, योग अभ्यासक असे साधारण दहा लाख साधक योगसाधना करणार आहेत.
रायगड जिल्ह्यात उरण इथे सकाळी साडे पाच वाजता जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीच्या टाऊनशिपमध्ये योग संगम कार्यक्रम होणार आहे.
सांगलीमध्येही उद्या सकाळी भक्तियोग, हा अनोखा उपक्रम साजरा होणार आहे. यामध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्यात एकाच वेळेस एकाच तालावरती योगासनं करण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्यातही योगदिनानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं भव्य योग जनजागृती सत्राचं आयोजन केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं योग दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम उद्या सकाळी बिबी का मकबरा परिसरात होणार आहे.
लातूर, जळगाव, नांदेड, धाराशिव, बीड, धुळे, वर्धा या जिल्ह्यांमध्येही योग दिनाचे कार्यक्रम होणार आहेत. सकाळच्या सत्रात होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. योग दिनाच्या निमित्ताने उद्या मुंबईत टिळक नगर इथल्या अंध जनमंडळ या संस्थेतर्फे १०० अंधांना दृष्टिहीनांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष रेनकोटचं वाटप करण्यात येणार आहे.
मुंबईत मंत्रालयाच्या प्रांगणात आज योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय संचार ब्युरो आणि वर्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने महादेवपुरा इथे आज छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं.