डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जागतिक विकास दरात घट होण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास आपल्या सर्व व्यापारी भागीदार देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावल्यानंतर, सुरू झालेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जागतिक विकास दरात सार्वत्रिक घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जागतिक अर्थव्यवस्थेबद्दलचा आपला ताजा अहवाल नुकताच जारी केला. अमेरिकेला मंदीच्या वाढता धोका असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यासोबतच, चीन, भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या प्रमुख देशांसोबतच जी ७ सदस्य राष्ट्रांचा विकासदरातही घट होणार असल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे. 

 

या ताज्या अहवालानुसार जानेवारी मध्ये वर्तवलेल्या अंदाजित आकडेवारीच्या तुलनेत २०२५ या वर्षात जागतिक उत्पादन २ पूर्णांक ८ दशांश टक्क्यापेक्षा कमी दरानं वाढेल असा अंदाज आहे, तर २०२६ मध्ये ही वाढ ३ टक्के इतकी असू शकेल असं नाणेनिधीनं म्हटलं आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात व्यक्त केलेल्या अंदाजाच्या तुलनेत हा दर १ दशांश टक्क्यानं कमी आहे.

 

अमेरिकेनं लावलेल्या आयात शुल्कामुळे जागतिक स्तरावर किमतींमध्ये मोठी वाढ होईल, यामुळे २०२५ मध्ये जागतिक ग्राहकांसाठीच्या किंमत वाढीचा दर ४ पूर्णांक ३ दशांश टक्के तर २०२६ मध्ये ३ पूर्णांक ६ दशांश टक्के राहील असा अंदाज नाणेनिधीनं वर्तवला आहे.