दिव्यांग सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार

ज्या समाजात दिव्यांग व्यक्तींना समतेची वागणूक दिली जाते, त्याच समाजाला खऱ्या अर्थानं विकसित म्हणता येईल, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं.

 

दिव्यांग सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्रातल्या अबोली जरीत, भाग्यश्री नडीमेताला, धृती रांका आणि देवांगी दलाल या चौघांना या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी सन्मानित केलं. अबोली जरीत यांनी जन्मतः ८० टक्के अपंगत्वावर मात करून भारतातल्या पहिल्या व्हीलचेअर मॉडेल म्हणून नावलौकिक मिळवला. त्यांना सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन या विभागात पुरस्कार मिळाला. श्रवणदोषासह जन्मलेल्या भाग्यश्री नडीमेताला यांनी कला आणि व्यावसायिक शिक्षिका म्हणून काम करताना ५००पेक्षा जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यांनाही सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन या विभागात पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुण्याची धृती रांका हिला जन्मतःच डाऊन सिंड्रोम आहे. तिनं आपल्या चित्रांच्या आणि कलाकृतींच्या माध्यमातून आपला आवाज शोधला आणि एक स्टार्टअप तिच्या कलाकृतींमधून उपयोगी वस्तू तयार करतो. धृती हिला श्रेष्ठ दिव्यांग बालिका विभागात पुरस्कार मिळाला. तर श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी जोश फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करणाऱ्या ऑडिऑलॉजिस्ट, लेखिका देवांगी दलाल यांना सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणून गौरवण्यात आलं.