विमानसेवेचा आढावा घेण्यासाठी केंद्राची चार सदस्यीय समिती

इंडिगो कंपनीच्या विस्कळीत विमानसेवेमुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येऊन आज परिस्थिती सामान्य होण्याची अपेक्षा आहे. येत्या तीन दिवसांत विमानसेवा पूर्वपदावर येईल, असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयांचे आयुक्त, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंडिगोच्या अधिकाऱ्यांसोबत काल आढावा बैठक घेतली. विमान सेवा कालमर्यादेचा आदेश नागरी विमान वाहतूक संचालनालयानं तात्काळ प्रभावानं स्थगित केला आहे. हवाई सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि अत्यावश्यक कारणांसाठी विमानसेवेवर अवलंबून असणाऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. यासर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारनं चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीला 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. इंडिगोची 1 हजाराहून अधिक विमान गेले दोन दिवस रद्द झाली होती. दरम्यान उड्डाण रद्द केलेल्या विमानातल्या सर्व प्रवाशांना पूर्ण पैसे तत्काळ परत करा, असे आदेश सरकारनं इंडिगोला दिले आहेत. इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एलबर्स यांनी प्रवाशांची माफी मागितली असून सर्व सेवा लवकरच पूर्ववत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर रेल्वेनं गाड्यांना अतिरिक्त डबे जोडून प्रवाशांची सोय केली आहे.