१ ते ७ डिसेंबर या कालावधीत विमानांची सुमारे ६ लाख तिकिटं रद्द झाली आहेत. या प्रवाशांचे ८२७ कोटी रुपये परत केल्याची माहिती इंडिगो या हवाई वाहतूक कंपनीनं दिली आहे. सोमवारी कंपनीनं सुमारे १८०० उड्डाणं केली आणि त्यातली ९१ टक्के वेळेवर होती, असं कंपनीनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. ९ हजार बॅगांपैकी साडे चार हजार बॅगा प्रवाशांच्या नियोजित पत्त्यावर पोहोचवण्यात आल्या असून उर्वरीत बॅगा पुढच्या ३६ तासांत परत केल्या जातील असं त्यात म्हटलं आहे.
विमान वाहतूक ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून याच्या सुरक्षेबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते राज्यसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. उड्डाणं रद्द का झाली याची चौकशी सरकार करत आहे, सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून यात दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं नायडू म्हणाले. देशाला किमान ५ मोठ्या विमान कंपन्यांची गरज आहे. त्यासाठी मंत्रालय प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.