इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून २२० पेक्षा जास्त उड्डाणं रद्द केली आहेत. मात्र, लवकरच आपली सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून पंधराशेहून जास्त उड्डाणं चालवण्याचं आश्वासन इंडिगोने आपल्या निवेदनात दिलं आहे.
इंडिगो विमान कंपनीने आपल्या रद्द केलेल्या किंवा व्यत्यय आलेल्या विमानांमुळे नुकसान झालेल्या सर्व प्रवाशांचे पैसे आज रात्री आठ वाजेपर्यंत परत करावेत, असे निर्देश सरकारने दिले आहेत. तसंच, पुढच्या २४ तासांत तिकीट रद्द झाल्यामुळे किंवा विलंबामुळे प्रवाशांपासून विलग झालेलं त्यांचं सर्व सामान शोधून त्यांना परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या तक्रारींसाठी तसंच पैशांच्या परतफेडीसाठी स्वतंत्र सुविधा कक्ष सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या कक्षांमार्फत संबंधित प्रवाशांशी संपर्क साधून परतफेडीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमानसेवेच्या उड्डाणांचं वेळापत्रक विस्कळीत झाल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून विमान उड्डाणांवर झालेल्या परिणामामुळे भारतीय रेल्वे सेवेने आपल्या विविध विभागांमध्ये पुढच्या दोन दिवसांसाठी ८९ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. मध्य रेल्वे विभागात पुणे ते बेंगळुरू, पुणे ते दिल्ली आणि मुंबई ते दिल्ली यासह विविध मार्गांवर १४ विशेष गाड्या, पश्चिम रेल्वे विभागात भिवानी ते मुंबई आणि मुंबई ते शकुरबस्ती अशा विविध मार्गांवर ७ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वे विभागात चेरलापल्ली ते शालीमार, सिंकदराबाद ते चेन्नई एगमोर आणि हैदराबाद ते मुंबई अशा तीन विशेष गाड्या चालवल्या जातील.