देशातल्या विमानसेवा व्यवस्थितपणे आणि पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इंडिगोच्या सेवेत सातत्यानं सुधारणा होत आहे, अशी ग्वाही नागरी विमानवाहतूक मंत्रालयानं आज दिली. विमानांची वेळापत्रकं पूर्वपदावर येत असल्याचंही मंत्रालयानं निवेदनाद्वारे सांगितलं. आज दिवसअखेरपर्यंत इंडिगोची उड्डाणं १ हजार ६५० पर्यंत पोहोचण्याची आशा आहे, असंही यात नमूद केलं आहे.
इंडिगोनं आज मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून २२०पेक्षा जास्त उड्डाणं रद्द केली. मात्र, लवकरच आपली सेवा पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू असून पंधराशेहून जास्त उड्डाणं चालवायचं आश्वासन इंडिगोनं आपल्या निवेदनात दिलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून विमान उड्डाणांवर झालेल्या परिणामामुळे भारतीय रेल्वेनं आपल्या विविध विभागांमध्ये पुढच्या दोन दिवसांसाठी ८९ विशेष गाड्या सोडायची घोषणा केली आहे. मध्य रेल्वे विभागात पुणे ते बंगळुरू, पुणे ते दिल्ली, आणि मुंबई ते दिल्ली, यासह विविध मार्गांवर १४ विशेष गाड्या, पश्चिम रेल्वे विभागात भिवानी ते मुंबई, आणि मुंबई ते शकुरबस्ती, अशा विविध मार्गांवर ७ विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वे विभागात चेरलापल्ली ते शालीमार, सिंकदराबाद ते चेन्नई- एगमोर, आणि हैदराबाद ते मुंबई, अशा ३ विशेष गाड्या चालवल्या जातील.