देशातलं अन्नधान्य उत्पादन यंदा सुमारे ३५७ दशलक्ष टन झालं असून गेल्यावर्षीच्या तुलनेत ते आठ टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव तसंच भारतीय कृषी अनुसंधान परिषदचे महासंचालक डॉ. एम. एल. जट यांनी आज दिली. नवी दिल्ली इथं सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्र संमेलनाच्या आधी घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. कृषी शास्त्राच्या प्रभावी व्यवस्थापनामुळे शेतातील पिकांचं धसकट जाळण्याच्या घटनांत ९५ टक्क्यांनी घट झाल्याचं सांगत जट यांनी यासाठी शेतकरी आणि संशोधकांचं अभिनंदन केलं.
भारतात कडधान्ये, तेलबिया आणि बाजरीसह विविध प्रकारची भरड धान्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. कृषी निर्यातीतही लक्षणीय वाढ झाल्यामुळे देशाच्या आर्थिक वृद्धीस चालना मिळत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.