डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारत आणि चीनमधले मतभेद कमी करून सीमावाद सोडवण्यासाठी उपाय शोधण्यावर भारताचा भर असल्याचं संरक्षणमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि चीन दरम्यान २०२०मध्ये झालेल्या सीमावादानंतर दोन्ही देशांत पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारतानं कायमच भर दिल्याचं राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षणमंत्री ॲडमिरल डोंग जुन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत सांगितलं. चीनमध्ये सुरू असलेल्या संरक्षणमंत्र्यांच्या SCO च्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांची स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत भारत-चीन सीमेवर शांतता आणि सौहार्द राखण्याची गरज अधोरेखित करत परस्पर मतभेद कमी करून सीमा वाद सोडवण्यासाठी उपाय शोधण्यावर भारताचा भर असल्याची भूमिका सिंह यांनी मांडली. दोन्ही देशांमधील संबंध सर्वसामान्य व्हावे, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त केलं.

 

परस्पर विश्वास, शांततेचे वातावरण आणि शेजारधर्म जोपासला जावा, आशिया आणि जगात स्थैर्य टिकवण्यासाठी सहकार्याची गरज असल्याचा मुद्दा सिंह यांनी उपस्थित केला. सीमावाद, तणाव निवळवणं, सीमा व्यवस्थापन आणि सीमारेषांची निश्चितीच्या मुद्द्यांवर विविध पातळ्यांवर सल्लामसलत सुरू ठेवण्याचं दोन्ही नेत्यांनी मान्य केलं. या बैठकीत राजनाथ सिंह यांनी पहलगामचा हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती चीनच्या संरक्षणमंत्र्यांना दिली. रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोउसॉव यांच्याशीही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत एस-४०० संरक्षण प्रणाली, एसयू-३० एमकेआय लढाऊ विमानांचे आधुनिकीकरण आणि अत्यावश्यक लष्करी उपकरणांचा वेगवान पुरवठा यासंबंधी सखोल चर्चा झाली.

 

आंतरराष्ट्रीय घडामोडी, सीमा पार दहशतवाद आणि भारत-रशिया संरक्षण सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. रशियाचे संरक्षण मंत्री बेलोउसॉव यांनी भारत-रशिया मैत्रीचा पुनरुच्चार केला. बेलारूस, ताजिकिस्तान आणि कजाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांबरोबरही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठका घेतल्या. या बैठकांत देशांसोबत संरक्षण सहकार्यात सातत्य ठेवण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. भारतानं संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होत केलेल्या प्रगतीची माहिती या देशांना संरक्षणमंत्र्यांनी दिली. पहलागमचा दहशतवादी हल्ला आणि त्याला ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं दिलेलं चोख प्रत्युत्तराची माहिती देखील सिंह यांनी दिली.