भारत आणि चीन दरम्यान पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारतानं कायम भर दिल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. चीनचे संरक्षणमंत्री ॲडमिरल डोंग जुन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ते बोलत होते. चीनमध्ये सुरू असलेल्या संरक्षणमंत्र्यांच्या SCO च्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. २०२०मध्ये झालेल्या सीमावादानंतर ताणले गेलेले दोन्ही देशांमधील संबंध सर्वसामान्य व्हावेत, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त केलं.
परस्पर विश्वास, शांततेचे वातावरण आणि शेजारधर्म जोपासला जावा, आशिया आणि जगात स्थैर्य टिकवण्यासाठी सहकार्याची गरज असल्याचा मुद्दा सिंह यांनी उपस्थित केला. सीमावाद, तणाव निवळवणं, सीमा व्यवस्थापन आणि सीमारेषांची निश्चितीच्या मुद्द्यांवर विविध पातळ्यांवर सल्लामसलत सुरू ठेवण्याचं दोन्ही नेत्यांनी मान्य केलं. या बैठकीत राजनाथ सिंह यांनी पहलगामचा हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती चीनच्या संरक्षणमंत्र्यांना दिली. रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोउसॉव यांच्याशीही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी द्विपक्षीय बैठक घेतली. बेलारूस, ताजिकिस्तान आणि कजाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांबरोबरही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठका घेतल्या.