भारतीय रेल्वेनं २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत एक अब्ज टन मालवाहतुकीचा आकडा ओलांडला आहे. या वर्षात १९ नोव्हेंबरपर्यंत १ अब्ज २ कोटी टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. सर्वाधिक ५० कोटी ५० लाख टन वाहतूक कोळशाची झाली असून खाद्यान्नाची वाहतूक ३ कोटी टन झाली आहे. रेल्वेद्वारे आतापर्यंत ९ कोटी २० लाख टन सिमेंट वाहतूक झाली आहे. सिमेंट क्षेत्राचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन रेल्वेनं सुधारणेच्या दिशेनं अनेक पावलं उचलली आहेत. खतांची वाहतूक ४ कोटी २० लाख टन झाली आहे.
एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत रेल्वेनं ९३ कोटी ५० लाख टनांहून मालवाहतूक केली असून गेल्या वर्षी याच कालावधीत ती सुमारे ९० कोटी ६० लाख टन होती.
भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूतपणा आणि भारतीय रेल्वेची वाढती परिचालन क्षमता यातून दिसून येत आहे.
रेल्वद्वारे अवजड मालाच्या वाहतुकीत होत असलेल्या वाढीमुळे आर्थिक प्रगतीसह इतरही अनेक लाभ होत आहेत. रस्त्यावर वाहतूक कोंडी कमी करणं, तसंच उद्योगांना पर्यावरणाला अनुकूल दळणवळणाचे पर्याय यामुळे उपलब्ध होत आहेत. निव्वळ कार्बन उत्सर्जनाच्या लक्ष्यानुरूप शाश्वत विकासाला यामुळे चालना मिळत आहे, असं रेल्वेनं म्हटलं आहे.