भारतीय रेल्वे दरवर्षी २ लाख ५६ हजार कोटी रुपये आधुनिकीकरणावर खर्च करत असून गेल्या ११ वर्षात ४६ हजार किलोमीटर रेल्वेमार्गाच विद्युतीकरण करण्यात आल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्लीत भारत मंडपम इथे आयोजित सोळाव्या आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. या प्रदर्शनात १५ देशांमधून साडेचारशेहून अधिक उद्योजक सहभागी झाले असून उत्तम दर्जाची रेल्वे आणि मेट्रो उत्पादनं त्यांनी या प्रदर्शनात ठेवली आहेत.
या प्रदर्शनामुळे भारतीय उद्योजकांच्या रेल्वे तंत्रज्ञानातल्या उत्पादनांना जागतिक व्यासपीठ मिळेल असं भारतीय उद्योग महासंघ- सीआयआय चे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी यावेळी सांगितलं.