व्हॉट्सॲप इतर उपकरणांशी जोडण्याच्या प्रक्रियेतल्या कमजोर दुव्यामुळे व्हॉट्सॲप खात्यांवर सायबर हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा सीईआरटी या भारताच्या सायबर सुरक्षा संस्थेनं दिला आहे. या कमजोर दुव्याला ‘घोस्ट पेअरिंग’ असं नाव देऊन यासंदर्भात संस्थेनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या. व्हॉट्सॲपचं खातं एखाद्या उपकरणाशी जोडताना पडताळणी न करता पेअरिंग कोड्स वापरून सायबर हल्लेखोर व्हॉट्सॲप खात्यांचं पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात, यासाठी पासवर्ड किंवा सिमकार्ड बदलण्याची गरज लागत नाही, अशी भीती यात व्यक्त करण्यात आली आहे. यात वापरकर्त्यांना एखाद्या विश्वासातल्या व्यक्तीकडून फोटो आणि त्यासोबत लिंक असा मेसेज येतो. ती लिंक बनावट फेसबुक वापरकर्त्याच्या प्रोफाइलची असते आणि तो मजकूर पाहण्यासाठी ‘व्हेरिफाय’ करावं असा संदेश येतो. इथं व्हॉट्सॲपच्या फोन नंबरद्वारे लिंक करायच्या फीचरचा वापर करून सायबर हल्लेखोर व्हॉट्सॲप खातं हॅक करतात आणि वापरकर्त्याचे फोटो, व्हिडिओ, संदेश यासह सर्व गोष्टी ते बघू शकतात. हे टाळण्यासाठी ओळखीच्या व्यक्तीकडून आलेल्या संशयास्पद लिंक्सवरही क्लिक करू नये, किंवा व्हॉट्सॲप, फेसबुकसारख्या दिसणाऱ्या कोणत्याही बाहेरच्या संकेतस्थळावर आपला फोन नंबर घालू नये, अशी सूचना सीईआरटीनं केली आहे.
Site Admin | December 20, 2025 7:49 PM | hijack | indian cyber | WhatsApp
व्हॉट्सॲप खात्यांवर सायबर हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा