आयसीसी विश्वचषक महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी मात करत भारतानं विश्वचषक पटकावला. नवी मुंबईतल्या डी वाय पाटील मैदानावर झालेल्या या सामन्यात दक्षिण अफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारतानं निर्धारित ५० षटकात ७ बाद २९८ धावा केल्या. शेफाली वर्मानं ८७, दिप्ती शर्मानं ५८, तर स्मृती मंधानानं ४५ धावा केल्या. ऋचा घोषनं ३४ धावांचं योगदान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २७ चेंडू बाकी असतानाच २४६ धावात गारद झाला. भारतातर्फे दिप्ती शर्मानं ५, शेफाली वर्मानं २, तर श्री चरणीनं १ बळी मिळवला. शेफाली वर्मा सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.
विश्वचषक पटकावून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर सर्व थरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे. या विश्वविजेत्या संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ५१ कोटी रुपयांचं रोख पारितोषक जाहीर केलं आहे.