भारत आणि अमेरिके दरम्यान व्यापार विषयक वाटाघाटी अद्याप सुरु असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं ‘इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरम २०२५ ला संबोधित करत होते. देशातले शेतकरी आणि लघु उत्पादकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले.
अमेरिकेबरोबरच्या वाटाघाटींमध्ये भारताला आपल्या मर्यादांची स्पष्ट जाणीव असून, देशहित लक्षात घेऊनच कोणताही निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेनं भारताच्या तेल आयातीवर निर्बंध लादले असले, तरी सर्वात मोठा तेल आयातदार असलेल्या चीनला मात्र त्यामधून वगळल्याचं त्यांनी नमूद केलं.
एकाच पुरवठा साखळीवर, अथवा एकाच देशावर अवलंबित्व असू नये, अशी शिकवण या अनुभवातून मिळाली असून, यापुढे स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेवर सरकारचा भर राहील, असं त्यांनी सांगितलं.
एकाच बाजारपेठेवर अवलंबून राहणं देखील हिताचं नसून, उत्पादनापासून बाजारपेठेपर्यंतचा प्रवासही महत्वाचा असल्याचं ते म्हणाले.