आमचा शेजारी देश स्वतःच्या नागरिकांवर बॉम्ब हल्ले करत असून, पद्धतशीरपणे नरसंहार करत असल्याचं भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश, ‘महिला, शांतता आणि सुरक्षा’ या विषयावर आयोजित खुल्या चर्चेत बोलत होते.
पाकिस्ताननं १९७१ साली ‘सर्च लाईट ऑपरेशन’ राबवलं होतं. त्यावेळी पाकिस्ताननं स्वतःच्या लष्कराकडून ४ लाख महिला नागरिकांविरोधात लैगिक अत्याचारांच्या मोहिमेला मान्यता दिली होती, असं ते यावेळी म्हणाले.
भारत, महिला, शांतता आणि सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या आपल्या उद्दिष्टांवर ठाम असून, विशेषतः ‘ ग्लोबल साऊथ’, म्हणजेच विकसनशील देशांना आपल्याकडचं कौशल्य देण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या शांतता उपक्रमांमध्ये सातत्यपूर्ण योगदान देऊन जागतिक शांततेप्रति आपली वचनबद्धता सिद्ध केल्याचं पार्वतानेनी हरीश यांनी सांगितलं.