डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 9, 2025 3:15 PM | India UK

printer

भारत-ब्रिटन व्यापक धोरणात्मक भागीदारीविषयी द्विपक्षीय चर्चा

भारत आणि युनायटेड किंग्डम नैसर्गिकरीत्या भागीदार असून लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य या मूल्यांवरचा विश्वास हा या भागीदारीचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याशी प्रतिनिधी मंडळस्तरावर चर्चा झाल्यानंतर ते संयुक्तपणे पत्रकारांना संबोधित करत होते. 

 

ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांचा भारत दौरा हा दोन्ही देशातल्या भागीदारीतल्या व्यापक दृष्टी आणि ऊर्जेचं प्रतीक असून ही भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा आधार बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. 

 

अलिकडेच भारत-ब्रिटन दरम्यान झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांचा व्यापार वाढेल तसंच रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं प्रधानमंत्री म्हणाले. स्टार्मर यांच्यासोबत इंडो-पॅसिफीक क्षेत्रात शांतता प्रस्थापित करणं, युक्रेन-रशिया आणि गाझापट्टीतील संघर्ष थांबवण्याबाबत चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं युक्रेन-रशिया आणि गाझातील संघर्षावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढावा यासाठी भारताचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

 

त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचं आज मुंबईत राजभवन इथं स्वागत केलं. या बैठकीनंतर प्रधानमंत्री मोदी आणि कीर स्टार्मर सीईओ फोरमला उपस्थित राहतील तसंच विविध उद्योगांच्या प्रमुखांशी भारत-ब्रिटन आर्थिक आणि व्यापार करारावर चर्चा करतील.  त्यानंतर दोन्ही नेते ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सहभागी होतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.

 

दरम्यान, कीर स्टार्मर यांनी काल विविध उद्योजकांशी संवाद साधला.  भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार हा युरोपियन महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनने स्वाक्षरी केलेला सर्वात मोठा करार असल्याचं  स्टार्मर उद्योजकांना संबोधित करताना म्हणाले.  स्टार्मर यांनी काल यशराज फिल्म्स स्टुडिओलाही भेट दिली. पुढच्या वर्षी यशराज फिल्म्सच्या ३ चित्रपटांचं ब्रिटनमध्ये छायाचित्रण होणार आहे. यामुळं ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत लाखो पौंडांची भर पडेल आणि ३ हजार रोजगार निर्माण होतील, असं स्टार्मर म्हणाले.