संयुक्त राष्ट्रांच्या आगामी उच्चस्तरीय अधिवेशनादरम्यान पॅलेस्टिनी अध्यक्ष महमूद अब्बास यांना दुरस्थ माध्यमातून संबोधित करण्याची परवानगी देण्याचा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या ठरावाच्या बाजूने भारताने मतदान केलं. अमेरिकेने पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनाप्रत्यक्ष उपस्थित राहण्यापासून रोखण्यासाठी व्हिसा नाकारला आहे. या पार्श्वभूमीवर हा ठराव मंजूर करण्यात आला. ‘पॅलेस्टिनी राज्याचा सहभाग’ या शीर्षकाचा ठराव मंजूर करण्यासाठी 193 सदस्यीय महासभेने 145 मतांनी ठरावाच्या बाजूने, पाच सदस्यांनी विरोधात तर सहा जण गैरहजर होते.
अमेरिका आणि इस्रायलने या निर्णयाविरुद्ध मतदान केले, तर भारत याला पाठिंबा देणाऱ्या देशांपैकी एक होता. या महिन्याच्या 23 तारखेपासून 80 व्या संयुक्त राष्ट्र महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेने पॅलेस्टिनी प्रतिनिधींना व्हिसा नाकारून आणि रद्द करून त्यांचा सहभाग रोखण्याच्या निर्णय घेतल्याबद्द या ठरावात खेद व्यक्त करण्यात आला आहे.