भारतातल्या पोलाद उद्योगात शून्य आयात करून फक्त निर्यातीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. मुंबईत बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या इंडिया स्टील २०२५च्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन दूरस्थ पद्धतीने केल्यानंतर ते बोलत होते. राष्ट्रीय पोलाद धोरणांतर्गत निर्धारित केलेल्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. येत्या २०३० पर्यंत देशातलं पोलाद उत्पादन ३० कोटी टनांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट असल्यांचही ते यावेळी म्हणाले.
भारत सध्या अडीच कोटी टन पोलाद निर्यात करण्याचं उद्दिष्ट ठेवून काम करत असून २०४७ पर्यंत पोलाद उत्पादन क्षमता ५० कोटी टनांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही ते यावेळी म्हणाले. देशातल्या तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्यासाठी उत्पादन, संशोधन आणि विकासात सहकार्य वाढवण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. तीन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत जागतिक पोलाद मूल्य साखळीतील आघाडीचे देश एकत्र येऊन, भविष्यातल्या वाटचालीवर चर्चा करणार आहेत.