डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी पोलाद उद्योगानं पुढाकार घ्यावा – मंत्री पीयूष गोयल

२०४७पर्यंत विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी पोलाद उद्योगानं पुढाकार घ्यावा, असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केलं आहे. ते आज मुंबईत इंडिया स्टील २०२५ आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत बोलत होते. 

 

स्टील उद्योग भारताच्या, संकटात टिकण्याच्या क्षमतेचं प्रतीक असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सरकार अनेक विकसित देशांशी FTA, अर्थात मुक्त व्यापार करार करण्याच्या प्रक्रियेत असून, त्यामुळं भारतीय स्टीलच्या निर्यातीला चालना मिळेल, असं गोयल यांनी सांगितलं.

 

कालपासून मुंबईत सुरु असलेल्या या परिषदेला, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दूरस्थ पद्धतीनं संबोधित केलं. गेल्या दहा वर्षात पायाभूत सुविधा आणि कारखानदारी केंद्रसरकारनं चालना दिल्यामुळे भारतीय रेल्वेमधे पोलादाची मागणी अनेक पटीनं वाढली आहे, असं त्यांनी सांगितलं. उद्योगांनी त्यांच्या गरजा सांगितल्या, तर त्या अधिक चांगल्याप्रकारे पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आम्हाला उत्पादन करता येईल, असं ते म्हणाले. 

 

भारताला ग्रीन स्टील अर्थात कार्बन उत्सर्जन आणि वातावरणावरचा परिणाम कमी करणाऱ्या शाश्वत पद्धतीनं उत्पादित केलेल्या पोलादाची जागतिक राजधानी बनवण्याचं आवाहन केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या परिषदेत केलं. तर, आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी गरज पडली तर पोलाद उत्पादनाला मोठा वाव असल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं.