डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

December 16, 2024 7:51 PM | India | SRILANKA

printer

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुहेरी कर आकारणी आणि कर चोरीला प्रतिबंध करण्यासाठी करार

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी आणि कर चोरीला प्रतिबंध करण्यासाठी करार झाले. तसंच, श्रीलंकेच्या नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भातले सामंजस्य करारही करण्यात आले. जाफना आणि ईस्टर्न युनिव्हर्सिटी या विद्यापाठांमधल्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अर्थसहाय्य देण्याची योजनाही यावेळी जाहीर करण्यात आली. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली, त्यानंतर हे करार करण्यात आले. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी परस्परहिताच्या मुद्द्यांवरही चर्चा केली. 

 

श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी दिसानायके यांनी भारताची निवड केल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी आनंद व्यक्त केला. या भेटीमुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारतानं पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर श्रीलंकेतही जल्लोष साजरा झाल्याचा उल्लेख मोदी यांनी केला. 

 

या भेटीमुळे दोन्ही देशांमधलं परस्पर सहकार्य वाढीला लागेल, असा विश्वास दिसानायके यांनी व्यक्त केला. दोन वर्षांपूर्वी श्रीलंकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आणि श्रीलंकेला कर्जमुक्त होण्याच्या प्रवासात भारताचा भक्कम पाठिंबा लाभला, असं त्यांनी सांगितलं.