रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर

तेविसाव्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवी दिल्लीत आगमन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. दोन दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान पुतिन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करणार आहेत. या दौऱ्या दरम्यान दोन्ही देशांमध्ये व्यापार, आरोग्यसेवा, तसंच आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि माध्यमांशी संबंधित अनेक करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देखील पुतीन यांची भेट घेणार असून आज त्यांनी पुतीन यांच्या सन्मानार्थ मेजवानीचं आयोजन केलं आहे. तत्पूर्वी काल दोन्ही देशांच्या विविध मंत्र्यांमध्ये नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली.

 

दरम्यान, पुतीन यांचं स्वागत करण्यासाठी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः जातीने उपस्थित राहिले याची रशियन सरकारने प्रशंसा केली आहे. दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना रशियन भाषेतील गीतेची प्रत भेट दिली. भारत दौऱ्यावर निघण्यापूर्वी प्रसार मध्यमांशी संवाद साधताना पुतीन म्हणाले की, भारत-रशिया दरम्यान असलेलं सौहार्द आणि सहकार्य कोणा एका देशाविरुद्ध नसून, उभय राष्ट्रांच्या राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी आहे. भारताने रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यावर अमेरिकेचा असलेला आक्षेप पुतीन यांनी फेटाळून लावला. प्रधानमंत्री मोदी हे दबावाला सहजपणे बळी पडणारे नाहीत आणि भारतीय लोकांना त्यांच्या नेत्याचा अभिमान वाटला पाहिजे, असं पुतीन म्हणाले.