२३व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन नवी दिल्लीत पोहोचले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. त्यापूर्वी दोन्ही देशांच्या विविध मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली.
रशिया हा भारताचा काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला खास आणि धोरणात्मक भागिदार असून, जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही दोन्ही देशांमधले संबंध सातत्यानं दृढ होत आहेत, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत लष्कर आणि लष्करी तांत्रिक सहकार्यविषयक भारत-रशिया आंतर सरकारी आयोगाच्या मंत्रालयस्तरीय बैठकीत बोलत होते. राजनाथ सिंग आणि रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलॉसोव्ह यांनी संयुक्तरित्या या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. रशियाच्या नेतृत्वाखालच्या युरेशियन आर्थिक संघाबरोबर मुक्त व्यापार करारासाठी चर्चेच्या प्रारंभाचं भारत स्वागत करत आहे, असं त्यांनी सांगितलं.
दोन्ही देशांमधल्या परस्पर संबंधांना एक धोरणात्मक पदर असून, दक्षिण आशिया आणि जागतिक सुरक्षेचा समतोल साधण्यात भारताबरोबरची भागिदारी हा अत्यंत महत्वाचा घटक असल्याचं रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलॉसोव्ह यांनी यावेळी सांगितलं. संरक्षण दल प्रमुखांसह तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख याबैठकीला उपस्थित होते.
केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज रशियाचे उपप्रधानमंत्री डेनिस मंतुरोव्ह यांच्या नेतृत्वाखालच्या रशियन शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी गुंतवणूक, बँकिंग, वित्त, इत्यादी महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.
नवी दिल्लीत आज भारत-रशिया व्यापार मंचाला वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल संबोधित केलं. भारत हा जगासाठी एक विश्वासार्ह, आणि भविष्याकडे पाहणारा भागिदार असून, व्यापार वाढवण्यासाठी, तसंच आर्थिक भागिदारी वाढवण्यासाठी योग्य स्थिती निर्माण करत आहे, असं ते यावेळी म्हणाले. केंद्रिय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांची भेट घेतली.
दरम्यान, पुतिन यांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर, भारतानं २ अब्ज डॉलर्सचा रशिया पाणबुडी करार केला आहे, असा दावा करणारं सोशल मीडियावरच्या वृत्ताचं केंद्र सरकारनं खंडन केले आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटने माहिती दिली आहे. मार्च २०१९ मध्ये झालेल्या जुन्या करारावर आधारित हा करार आहे.