२०३० पर्यंत आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर भारत आणि रशियामध्ये आज सहमती झाल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यासोबत नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाल्यावर संयुक्त निवेदनात ते बोलत होते.
या सहकार्यामुळं दोन्ही देशातला व्यापार बहुआयामी आणि समतोल होईल. तसंच निर्यातीच्या, विविध उत्पादनाच्या संयुक्त उत्पादनाच्या संधी निर्माण होतील, असं प्रधानमंत्री म्हणाले. कृषी आणि खत निर्मिती क्षेत्रात आणखी सहकार्य करण्यावर दोन्ही देश तयार झाले आहेत. संयुक्तरित्या युरिया उत्पादनासाठी दोन्ही देशात प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. ऊर्जा सुरक्षा हा दोन्ही देशांच्या संबंधातला महत्त्वाचा घटक आहे. याशिवाय नागरी अणूऊर्जेच्या क्षेत्रातही दोन्ही देश सहकार्य करत असल्याचं मोदी म्हणाले.
दहशतवाद हा मानवतेवर हल्ला आहे. त्याच्याविरोधात काम करण्यासाठी दोन्ही देश तयार आहेत. शिवाय युक्रेनचा मुद्दा शांततापूर्ण मार्गाने निकाली निघावा यासाठी होत असलेल्या सर्व प्रयत्नांना भारत पाठिंबा देईल, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
यावेळी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि ग्राहक सुरक्षा, कौशल्य विकास, खेळ यासह विविध विषयांवर दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले.
त्यापूर्वी पुतीन यांचं आज सकाळी राष्ट्रपतीभवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं. यावेळी पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्याआधी पुतीन यांनी नवी दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.