भारत आणि ओमानमधे व्यापक आर्थिक भागीदारी करार आज झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ओमान भेटीत मस्कत इथं आज काररावर स्वाक्षऱ्या झाल्या. उभय देशांच्या संबंधांमधला हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. या करारानुसार, भारताच्या कापड, चामडं, पादत्राणं, रत्न आणि आभूषणं, अभियांत्रिकी उत्पादनं, प्लास्टिक, फर्निचर, शेती, औषध उत्पादन, वैद्यकीय उपकरणं आणि ऑटोमोबाईल उत्पादनांना ओमानच्या ९८ टक्क्यापेक्षा जास्त टॅरिफ लाईन्सवर शून्य सीमाशुल्क आकारलं जाईल. भारताच्या एकूण निर्यात मूल्यामध्ये याचा ९९ टक्क्यापेक्षा जास्त वाटा आहे. युनायटेड किंगडम बरोबरच्या करारानंतर सहा महिन्यांमधला भारताचा हा दुसरा मुक्त व्यापार करार आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि इतर व्यापार संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओमानच्या दौऱ्यावरून आज मायदेशी परतले. भारत आणि ओमान दरम्यानचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल, त्यांना आज ओमानचे सुलतान ‘हैथम बिन तारिक’ यांनी ‘ऑर्डर ऑफ ओमान’, या ओमानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या तीन देशांच्या दौऱ्याचा हा शेवटचा टप्पा होता.