भारत – ओमान व्यापार शिखर परिषद दोन्ही देशांच्या भागीदारीला एक नवी दिशा आणि गती देईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज ओमानची राजधानी मस्कत इथं शिखर परिषदेला संबोधित करत होते. ओमान आणि भारत प्राचीन काळापासून एकमेकांसोबत व्यापार करत आहेत, अरबी समुद्र दोन्ही देशांना जोडणारा पूल म्हणून काम करतो असं प्रधानमंत्री म्हणाले. दोन्ही देशांची मैत्री प्रत्येक काळात मजबूत होत असून हे नातं विश्वासाच्या पायावर उभं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दोन्ही देशातील आर्थिक भागीदारीमुळे व्यापाराला नवी गती मिळेल, गुंतवणुकीदारांच्या मनात विश्वास निर्माण होईल आणि, प्रत्येक क्षेत्रात संधीची नवी दारं उघडली जातील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला.
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वेगाने जात आहे, याचा फायदा ओमानलाही होणार आहे असं सांगत प्रधानमंत्र्यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख केला. आर्थिक धोरणात मूलभूत बदल केल्यामुळे देश प्रगतीपथावर जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.
त्याआधी काल मस्कत विमानतळावर ओमानचे उपप्रधानमंत्री आणि संरक्षण व्यवहार मंत्री सय्यद शिहाब बिन तारिक अल सैद यांनी प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत केलं. विविध क्षेत्रात भारत-ओमान सहकार्य मजबूत करणं आणि धोरणात्मक भागीदारी वाढवणं यावर उभय नेत्यांनी चर्चा केली. ओमानचे सुलतान आणि राष्ट्रप्रमुख हैथम बिन तारिक यांच्या निमंत्रणावरून प्रधानमंत्री मोदी ओमानला भेट देत आहेत. दोन्ही देश आज ऐतिहासिक व्यापक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी करतील. उभय नेत्यांच्या उपस्थितीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस अल युसूफ करारावर स्वाक्षरी करतील.