भारत- न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांनी आज दूरध्वनीवरुन चर्चा केल्यानंतर ही घोषणा केली. येत्या ३ महिन्यात त्यावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन गेल्या मार्चमधे भारतभेटीवर आले असताना उभय राष्ट्रात मुक्त व्यापार कराराबद्दलची बोलणी सुरु झाली होता. विक्रमी वेळात ती पूर्ण झाली आहेत. या करारानुसार भारतातून न्यूझीलंडमधे निर्यात होणाऱ्या मालावर मोठ्या सवलती मिळणार असून भारतात नयूझीलंडमधून येणाऱ्या मालावरच्या शुल्कात ७० टक्के सवलत असेल.व्हिसाचे नियम अधिक सुटसुटीत होतील, दोन्ही देशात शेती, लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग, शिक्षण इत्यादी क्षेत्रांमधे व्यापाराच्या संधी वाढतील आणि पुढच्या ५ वर्षात परस्पर व्यापार दुप्पट होईल असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. या करारानुसार पुढच्या १५ वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात सुमारे २० अब्ज डॉलर्स गुंतवणूक होईल अशी अपेक्षा आहे. मात्र न्यूझीलंडच्या दूध आणि दुधाच्या पदार्थांवर कोणतीही सवलत दिली जाणार नाही असं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.