भारत आणि मंगोलिया हे दोन्ही देश समान सांस्कृतिक परंपरा, लोकशाही मूल्यं आणि विकासासाठी वनचबद्ध असून दोन्ही देशांचे संबंध विश्वास आणि मैत्रीच्या पायावर उभे असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मंगोलियाचे अध्यक्ष खुरेलसुख उखना यांच्यासोबत नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्त वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. गेल्या दशकभरात भारत आणि मंगोलिया यांच्यातली भागीदारी अधिकाधिक दृढ होत आहे, ग्लोबल साऊथचा आवाज बुलंद करण्यासाठी दोन्ही देश काम करत आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले. भारताने मंगोलियाच्या विकासात केलेल्या सहयोगाबद्दलही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. भारताच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे मंगोलियाच्या ऊर्जा सुरक्षेत वाढ होईल. तसंच मंगोलियन नागरिकांसाठी निःशुल्क ई व्हिसा देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे अध्यक्ष खुरेलसुख उखना यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीत द्विपक्षीय संबंधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला, तसंच काही सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. भारत भेटीवर आलेले राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख उखना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही भेटणार आहेत.