प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातल्या प्रतिनिधींच्या परिषदेला ते संबोधित करणार आहेत. भारत समुद्री सप्ताह २०२५ या नौवहन परिषदेत होणाऱ्या जागतिक सागरी मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचं अध्यक्षपदही ते भूषवतील.
पाच दिवसांच्या या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते २७ तारखेला झालं. केंद्रीय बंदरविकास, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही या परिषदेला संबोधित केलं. परिषदेच्या पहिल्या दिवशी राज्याच्या बंदर विभागानं सागरी व्यापार क्षेत्रात ५६ हजार कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली.
इंडिया मेरीटाइम वीकच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे काल, सोनोवाल यांच्या हस्ते समुद्री वारसा दिनाचं उद्घाटन, तसंच लोथल इथल्या प्रस्तावित राष्ट्रीय समुद्री नौकानयन वारसा संकुलाच्या बोधचिन्हाचं अनावरण आणि संशोधन अहवालाचं प्रकाशन झालं, तसंच विविध देशांच्या सत्रांमध्ये त्यांनी आपले विचार मांडले.
परिषदेत ८५हून अधिक देशांतले एक लाखाहून अधिक प्रतिनिधी, तसंच साडेतीनशेहून अधिक आंतरराष्ट्रीय वक्ते सहभागी होणार आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध देशांसोबत द्विपक्षीय बैठका, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या इत्यादी कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.