भारत आणि जॉर्डन यांच्यातले द्विपक्षीय संबंध हे ऐतिहासिक विश्वास आणि भविष्यातल्या आर्थिक संधी यांच्यावर आधारलेले आहेत. जगाला एका विकासाच्या इंजिनची, विश्वासार्ह पुरवठा साखळीची गरज असून भारत आणि जॉर्डन ती पुरवू शकतात, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. जॉर्डनची राजधानी अम्मान इथं भारत-जॉर्डन व्यापार मंचाला ते संबोधित करत होते.
दोन्ही देशांना कोणकोणत्या क्षेत्रात सहकार्य वाढवता येईल, आणि भूगोलाला संधींमध्ये आणि संधींना विकासात कसं बदलता येईल, याबाबत जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे इब्न अल हुसैन यांच्याशी तपशीलवार चर्चा झाल्याची माहिती मोदी यांनी दिली. भारतीय कंपन्या जॉर्डनमार्गे अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांमधल्या बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकतात, याचा लाभ भारतीय कंपन्यांनी घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. तसंच जॉर्डनच्या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचं निमंत्रण दिलं. डिजिटल पायाभूत सुविधा आणि माहिती तंत्रज्ञान, औषधं आणि वैद्यकीय उपकरणं निर्मिती, कृषी, हरित विकास, सांस्कृतिक पर्यटन इत्यादी क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचं मोदी यांनी अधोरेखित केलं.
जॉर्डनचं भौगोलिक स्थान, इतर देशांबरोबरचे मुक्त व्यापार करार आणि भारताची आर्थिक क्षमता आणि आधुनिक उद्योग यांच्या जोरावर दक्षिण आशियाला मध्यपूर्व, आफ्रिका आणि युरोपशी जोडणारा आर्थिक कॉरिडॉर होण्याची क्षमता या दोन देशांमध्ये आहे, अशी ग्वाही जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे इब्न अल हुसैन यांनी यावेळी बोलताना दिली. या कार्यक्रमादरम्यान भारत आणि जॉर्डन यांच्यात विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.
प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी इथिओपियाची राजधानी अदिस अबाबाला रवाना होतील.