भारत आणि इस्रायल यांनी दीर्घकालीन दृष्टिकोनातून द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी भक्कम करण्यास सहमती दर्शविली आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक मेजर जनरल अमीर बाराम यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे की संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी संस्थात्मक चौकट विकसित करण्यावर बैठकीत सहमती झाली.
मेजर जनरल अमीर बाराम यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईला पूर्ण पाठिंबा दर्शविला. संरक्षण सचिवांनी दहशतवादाबद्दल भारताच्या शून्य सहनशीलतेच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला आणि ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला आणि सर्व ओलिसांची सुटका करण्याचं आवाहन केलं. गेल्या वर्षी जुलैमध्ये भारतात झालेल्या शेवटच्या संयुक्त कार्यगटाच्या बैठकीपासून सुरू असलेल्या संरक्षण सहकार्य उपक्रमांच्या प्रगतीचाही दोन्ही बाजूंनी आढावा घेतला.