सध्या भारताच्या दौऱ्यावर असलेले चीनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री वांग यी यांनी काल राजधानी नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. ‘भारत आणि चीनमधील स्थिर आणि रचनात्मक संबंध आगामी काळात प्रादेशिक, जागतिक शांतता तसंच समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील’, असं प्रधानमंत्री मोदी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी भारत-चीन सीमेवर उभय देशांनी शांतता आणि स्थैर्य राखण्याचं महत्त्व अधोरेखित केलं आणि सीमाप्रश्न निष्पक्ष, वाजवी आणि परस्पर स्वीकारार्ह पद्धतीनं सोडविण्यासाठी भारताची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. वांग यी यांनी तियानजिनमध्ये होणाऱ्या शांघाय सहकारी संघटना अर्थात एससीओ शिखर परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा संदेश आणि निमंत्रण प्रधानमंत्र्यांकडे सुपूर्द केले. प्रधानमंत्री मोदींनी गेल्या वर्षी काझानमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांच्याशी झालेल्या भेटीनंतर द्विपक्षीय संबंधांमध्ये होत असलेल्या स्थिर आणि सकारात्मक प्रगतीचं स्वागत केलं.