भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला बोत्सवानाने ८ चित्त्यांची देणगी दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गॅबोरोन संरक्षित अरण्यात या प्रतिकात्मक हस्तांतरणाचा सोहळा झाला. बोत्सवानाचे अध्यक्ष ड्यूमा बोको देखील यावेळी उपस्थित होते. बोत्सवानातल्या घांझी जंगलातून आणलेले हे चित्ते भारतात पोहोचल्यावर त्यांना सुरुवातीला काही काळ विलगीकरणात ठेवलं जाईल. यापूर्वी नामिबियामधून ८ तर दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते आणले आहेत. त्यातले बहुतेक सगळे इथल्या वातावरणाला सरावले आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज बोत्सवानामधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. कार्यक्रमात सुरुवातीला दिल्ली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना एक मिनिटभर मौन पाळून आदरांजली वाहिली. बोत्सवाना आणि भारतादरम्यान स्नेहाचा सेतू बांधण्याचं आवाहन मुर्मू यांनी केलं. २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माणाच्या यात्रेत तिथले भारतीयही सोबतीला आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.