पाकिस्ताननं भारताच्या भूभागात, विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे बळकावलेल्या प्रदेशात मानवी हक्काचं उल्लंघन थांबवावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी केलं आहे. ते काल ८० व्या संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त आयोजित खुल्या चर्चे दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित करत होते.
जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तिथले नागरिक भारताची लोकशाही परंपरा आणि संवैधानिक चौकटीनुसार आपले मूलभूत अधिकार बजावत आहेत. मात्र पाकिस्तान मानवी हक्क या संकल्पनेपासून अनभिज्ञ असल्याचं ते यावेळी म्हणाले.
भारतासाठी ‘वसुधैव कुटुम्बकम’ हा केवळ जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नसून, ‘सर्वांसाठी न्याय, प्रतिष्ठा, संधी आणि समृद्धी’ याचा पुरस्कार करण्यामागची धारणा आहे. आणि यामुळेच बहुपक्षीयता, आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि सहकार्यावर भारताचा ठाम विश्वास आहे, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांना नव्या युगाच्या उद्दिष्टांना अनुरूप बनवण्यासाठी, हा दृष्टिकोन साकारायला सर्व सदस्य राष्ट्रांनी एकत्र यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.