भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या तीन देशांनी तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातली एक नवीन त्रिपक्षीय यंत्रणा अर्थात भागीदारी व्यवस्था घोषित केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्या काल जोहान्सबर्ग इथे जी २० शिखर परिषदेच्या निमित्ताने झालेल्या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली. या भागीदारी व्यवस्थेमुळे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात सहकार्य वाढीस लागेल, असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे.
या अंतर्गत हरित ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महत्वाच्या खनिजांसाठी पुरवठा साखळ्या या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. जी २० च्या माध्यमातून जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा हा एक भाग असून येत्या वर्षात मार्च अगोदर या तिन्ही देशांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक होणं अपेक्षित आहे.