भारत- युके दरम्यान मुक्त व्यापार करारावर आज स्वाक्षऱ्या झाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिटीश प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याबरोबरची बैठक संपल्यावर संयुक्त निवेदनात ही माहिती दिली. या करारामुळे भारतीय वस्त्रं, पादत्राणं, मौल्यवान रत्नं, मासळी, प्रक्रीया केलेले खाद्यपदार्थ आणि अभियांत्रिकी उपकरणांना युकेमधली बाजारपेठ खुली होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि कराराबद्दल समाधान व्यक्त केलं
युरोपीय संघातून बाहेर पडल्यानंतर युकेच्या दृष्टीनं भारताबरोबरचा मुक्त व्यापार करार हा महत्त्वाचा आर्थिक करार असल्याचं युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर म्हणाले. या करारामुळे युकेमधे भारतीय उत्पादनं स्वस्त होतील. युकेच्या अर्थव्यवस्थेत दरवर्षी ४ अब्ज ८० कोटी पौंडाची वाढ अपेक्षित आहे.
भारत – युके मुक्त व्यापार कराराचं भारतीय उद्योग महासंघ, सीआयआयने स्वागत केलं आहे. सी आयआयचं १६ सदस्यीय शिष्टमंडळ यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपस्थित होतं. या करारामुळे दोन्ही देशांचा घसघशीत फायदा होणार असल्याची प्रतिक्रीया शिष्टमंडळाचे प्रमुख आणि भारती एंटरप्राईझेसचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी दिली. या करारामुळे भविष्यातल्या भागीदारीचा पाय रचला गेल्याची प्रतिक्रीया संघटनेचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी दिली.