भारत आणि फिलीपिन्स यांच्यात आज ९ सामंजस्य करार झाले. यात दोन्ही देशातील धोरणात्मक संबंध, गुन्हेगारी-संरक्षण-विज्ञान आणि तंत्रज्ञान याबाबत परस्पर कायदेशीर सहकार्य यांचा समावेश आहे. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डीनांद रोमुअल देज मार्कोस ज्युनियर उपस्थित होते.
भारत आणि फिलीपिन्स यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर फिलीपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीला विशेष महत्त्व आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संयुक्त संबोधनात म्हणाले.
प्राचीन काळापासून दोन्ही देशांमधे संबंध आहेत, असं सांगत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी मार्कोस यांचे आभार मानले.
संरक्षण क्षेत्रात दोन्ही देश परस्पर सहकार्य वाढवणार आहेत, असं फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष मार्कोस यावेळी म्हणाले. भारत आणि फिलिपिन्स यांनी दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय सहकार्यात वाढ करून धोरणात्मक भागीदारी आखण्यात येईल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव पेरियासामी कुमारन यांनी वार्ताहरांना सांगितलं. परस्पर भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी दोन्ही देशांच्या नेत्यांनी २०२५ ते २०२९ या वर्षांसाठी कृती आराखडा स्वीकारल्याचंही कुमारन म्हणाले.