डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मालदिव आणि भारत यांच्यात ४ सामंजस्य करार आणि इतर तीन करार

भारत आणि मालदीव हे देश फक्त शेजारी नाहीत, तर सहप्रवासी आहेत. मालदीवचा विकास आणि समृद्धीसाठी भारत प्रत्येक पावलावर साथ देईल, अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली. मालदीव दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्यासोबत त्यांनी वार्ताहरांना संबोधित केलं. भारताच्या मदतीनं मालदीवमध्ये उभारलेल्या विविध प्रकल्पांमुळे दोन्ही देशांमधले संबंध नव्या उंचीवर गेले आहेत, असं ते म्हणाले. द्विपक्षीय गुंतवणूक करार, हवामान क्षेत्रातलं सहकार्य, नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांध्ये दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढवण्यावर त्यांनी भर दिला. भारत-प्रशांत क्षेत्रात शांती, स्थिरता आणि समृद्धी हे भारत आणि मालदीव यांचं समान ध्येय आहे, असं ते म्हणाले.

मोदी यांच्या उपस्थितीत आज ४ सामंजस्य करार आणि इतर तीन करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या असून यामुळे मालदीवच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असं मुइझ्झू यांनी यावेळी सांगितलं. यात ५६५ मिलियन अमेरिकी डॉलरच्या लाइन ऑफ क्रेडिट कराराचा समावेश असून, यामुळे मालदीवच्या संरक्षण, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण क्षेत्राला मदत होईल, असं ते म्हणाले. भारत आणि मालदीव मुक्त व्यापार कराराबाबतच्या चर्चेला सुरुवात झाली असल्याचं मुइझ्झू यांनी नमूद केलं.

 

तत्पूर्वी आज मालेमधे रिपब्लिक स्क्वेअर इथं प्रधानमंत्री मोदी यांना बंदुकीच्या २१ फैरी झाडून सलामी देण्यात आली. मोदी यांनी अध्यक्ष मुइझ्झू यांच्याशी दोन्ही देशांच्या हितसंबंधाबाबतच्या विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा केली. त्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यात प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा झाली. भारत आणि मालदीव यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना ६० वर्षं पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ एका विशेष तिकिटाचं लोकार्पण मोदी आणि मुइझ्झू यांनी केलं. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यानंतर भारताच्या मदतीनं हुलहुमाले इथं बांधलेल्या तीन हजारापेक्षा जास्त घरकुलांचं लोकार्पण आणि अद्दू शहरातले रस्ते आणि जलनिस्सारण यंत्रणेचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते झालं. त्यानंतर मोदी आणि मुइझ्झू यांनी मालदीवमधल्या ६ विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं.

 

उद्या मालदीवच्या ६०व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात प्रधानमंत्री मोदी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा