देश एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज होत आहे. नागरिकांच्या उत्साहाला उधाण आलं असून नव्या आकांक्षा, नवी स्वप्नं आणि नव्या आशा यांचा जागर उद्या साजऱ्या होणाऱ्या या राष्ट्रीय सणाच्या निमित्तानं केला जात आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतील आणि किल्ल्याच्या तटावरून देशाला संबोधित करतील.
स्वातंत्र्य दिनाची यंदाची मध्यवर्ती संकल्पना ‘नवा भारत’ अशी आहे. यंदा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या यशावर विशेष भर असेल. विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या जवळपास पाच हजार नागरिकांना लाल किल्ल्यात होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. यात समावेश असलेल्या देशभरातल्या २१० सरपंचांपैकी १५ सरपंच महाराष्ट्रातले असून यात नऊ महिला सरपंच आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या संध्याकाळी विविध लष्करी आणि निमलष्करी दलांचे वाद्यवृंद देशभरातल्या सुमारे १४० ठिकाणी सादरीकरण करणार आहेत.