रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलास्कामध्ये महत्त्वाची शिखर परिषद कोणत्याही कराराविना संपली. अलास्कातील लष्करी तळावर जवळपास तीन तास झालेल्या चर्चेला मोठी प्रगती असं संबोधलं गेलं असलं तरीही या बैठकीत, युक्रेन रशिया संघर्षासंदर्भात तोडगा निघण्याची अपेक्षा फोल ठरली. बैठकीनंतर झालेल्या संयुक्त परिषदेला संबोधित करताना पुतीन यांनी चर्चेचा मुख्य मुद्दा युक्रेन संघर्ष असल्याचं सांगितलं. हा संघर्ष संपवण्यात रशियाला रस असल्याचं पुतीन म्हणाले. रशियाने संघर्षाची प्राथमिक कारणे दूर करण्याची गरज असून, युक्रेन आणि युरोपने चर्चेत अडथळा आणू नये असा इशारा त्यांनी दिला आहे. आता संघर्षाकडून संवादाकडे जाण्याची वेळ आली असल्याचं सांगून, 2022 मध्ये ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असते तर हा संघर्ष उद्भवला नसता असंही पुतीन यावेळी बोलताना म्हणाले. तर ही बैठक फलदायी झाल्याचं सांगून अनेक मुद्द्यांवर उभय देशांची सहमती झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि रशियाला प्रगतीची खूप संधी असल्याचं सांगून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासह नाटो सहकारी देशांशी दूरध्वनीवरून संवाद साधतील. हा करार या दोन्ही देशांचा निर्णय असेल आणि तो त्यांना मान्य करावा लागेल असंही ट्रम्प म्हणाले.