राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असून नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा जोर कायम असून, आज सकाळी संपलेल्या २४ तासांत खेड तालुक्यात सर्वाधिक १७८ मिलिमीटर, दापोली आणि चिपळूण या तालुक्यांत प्रत्येकी १२५ मिलिमीटर, तर मंडणगडमध्ये ११६ मिलिमीटर पाऊस पडला. खेडमधल्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपेठ परिसरात पाणी शिरलं आहे. नारिंगी, कुडावळे नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. दापोली-मंडणगड रस्त्यावरची वाहतूक बंद झाली आहे. माखजन इथंही बाजारपेठेत पाणी शिरलं आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या पूर्णा प्रकल्पाचे सिद्धेश्वर धरण पूर्णक्षमतेने भरलं आहे. आज सकाळी धरणाचे आठ दरवाजे एक फूट उघडून सात हजार घनफूट प्रति सेकंद, तर इसापूर धरणातून सध्या ५४ हजार ४६६ घनफूट प्रति सेकंदवेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे पैनगंगा नदी काठावरच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वाशीम जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा रात्रभर मुसळधार पाऊस झाला. अडाण नदीला पूर आल्यानं शेलूबाजार इथं नागरी वस्तीत पाणी शिरलं. प्रशासनानं तातडीनं रात्रीच रहिवाशांना स्थानिक शाळेत हलवलं. मालेगाव तालुक्यात जौळका इथं काटेपूर्णा नदीवर पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक वाशीम मार्गे वळवण्यात आली.
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सतत पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विष्णूपुरी प्रकल्पातल्या एकूण १८ दरवाजापैकी सध्या ४ दरवाजे उघडले आहेत. पूरस्थितीच्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणा कार्यरत असून आवश्यक ती खबरदारी आणि उपाययोजना प्रशासन करत आहेत.
परभणी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यानं ओढे नाले आणि नद्यांना पूर आला आहे. अनेक शेतांमध्ये पुराचं पाणी जाऊन खरिपाच्या पिकांसह भाजीपाल्याचं नुकसान झाले आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे, पूर्णा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.