नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा पंधरा ते वीस दिवस आधीच सुरू होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि अरबी समुद्र–दक्षिण मध्य महाराष्ट्रातील द्रोणीय स्थितीमुळे राज्यभर पावसाचा जोर वाढला आहे. लातूर, नांदेड, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे, तर पुणे घाटमाथा, रायगड आणि रत्नागिरी इथं सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
१५ सप्टेंबरला राजस्थानमधून, १७ सप्टेंबरला वायव्य भारतातून तर १५ ऑक्टोबरला संपूर्ण देशातून मान्सून परत जाईल. दरम्यान, मान्सून परतल्यानंतरही अवकाळी पाऊस सुरू राहील, सप्टेंबरच्या अखेरीस वातावरणातील उष्मा वाढून ‘ऑक्टोबर हीट’ जाणवण्याची शक्यता असून, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाचं प्रमाण वाढू शकतं, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.
यंदा मान्सून २४ मे ला केरळमधे दाखल झाला आणि २९ जूनपर्यंत देशभरात पसरला. आतापर्यंत देशात ८३६ पूर्णांक २ दशांश मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरीच्या तुलनेत ७ टक्के जास्त आहे.