गोव्यात सुरू असलेल्या ५६व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल यांनी धर्मेंद्र यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. धर्मेंद्र यांच्या निर्मिती संस्थेत तयार झालेल्या ‘बेताब’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल रवैल यांनी केलं होतं.
इफ्फीत आज चित्रपट निर्माते जिगर नागदा यांचा द व्हिस्पर्स ऑफ द माउंटन्स हा चित्रपट दाखवण्यात आला. राजस्थानमध्ये राजसमंद आणि उदयपूर इथे या चित्रपटाचं चित्रीकरण झालं असून पर्यावरणविषयक जबाबदारी आणि विकासाच्या प्रश्नांवर बेतलेली पितापुत्राची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आज ‘द लास्ट व्हायकिंग’, ‘माय फादर्स शॅडो’ आणि ‘ब्लॅक रॅबिट, व्हाइट रॅबिट’ या चित्रपटांचे प्रीमियर होणार आहेत. तसंच तपन सिन्हा यांचा १९९०मध्ये प्रदर्शित झालेला एक डॉक्टर की मौत हा चित्रपट देखील आज प्रदर्शित होणार आहे.