भारतानं संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईच्या नागरिकांसाठी कोचीन, कालिकत आणि अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळांवर व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळं आता युएईच्या नागरिकांना आता भारतातील नऊ प्रमुख विमानतळांवर ही सुविधा उपलब्ध झाली आहे. पूर्वी ही सुविधा नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि कोची इथं उपलब्ध होती.
युएईच्या ज्या नागरिकांनी पूर्वी भारतीय ई-व्हिसा किंवा नियमित कागदी व्हिसा मिळवला आहे, त्यांच्यासाठीच ही योजना असून, या योजनेअंतर्गत ते ६० दिवसांपर्यंत भारतात राहू शकतात. या व्हिसासाठी अर्जदारांकडे किमान सहा महिन्यांची वैधता असलेला पासपोर्ट असणे आवश्यक आहे. पर्यटन, व्यवसाय किंवा वैद्यकीय कारणांसाठी भारतात येणाऱ्या युएईच्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे, त्यांना सहजपणे भारतात येणं शक्य व्हावं, दोन्ही देशांमधले संबंध दृढ व्हावेत, या उद्देशानं ही सुविधा देण्यात आली आहे.