गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या ५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजच्या तिसऱ्या दिवशी सिनेप्रेमींना विविध जागतिक चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. व्हॅलेंटिना बेर्तिनी आणि निकोल बेर्तिनी यांचा ‘मॉस्किटोज’ हा इटालियन चित्रपट, जफार पनाही यांचा ‘इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट’, सूर्या बालकृष्णन यांचा ‘दीपा दीदी’ आणि देबांकर बोर्गोहाईन यांचा ‘सिकार’ हा आसामी चित्रपट यासह इतर अनेक चित्रपट आज ‘इफ्फी’मध्ये दाखवले जात आहेत. नारी शक्तीचं स्थान अधोरेखित करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच ५० महिला दिग्दर्शकांचे चित्रपट इथं दाखवले जात असून आज सिंपल दुगार यांचा ‘लोकमाता देवी अहिल्याबाई’ हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येईल. याशिवाय, प्रसिद्ध निर्माते विधू विनोद चोप्रा यांचा मास्टरक्लास, बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या संचालक ट्रिशिया टटल यांच्याशी ‘इफ्फी’चे संचालक शेखर कपूर यांचा संवाद, यासह विविध सत्रं आणि कार्यक्रम इथं होत आहेत.