पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. यात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची परिषद झाली. पायरसी रोखण्याचे उपाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देणं आणि जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय चित्रपटांना स्थान देणं इत्यादी विषयांवर यावेळी चर्चा झाली. या क्षेत्राला नवे आयाम देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याचं आवाहन माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी केलं. या परिषदेत टोगो, मोरोक्को, आयर्लंड, क्यूबा, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, इस्रायल, गयाना इत्यादी देशांचे राजदूत सहभागी झाले होते.
इफ्फीमधल्या मास्टरक्लासेसचं उद्घाटन आज झालं. यात चर्चा, कार्यशाळा, गोलमेज संवाद, मुलाखत सत्रं, संभाषणात्मक कार्यशाळा यांचं आयोजन होईल. विधु विनोद चोप्रा, अनुपम खेर, मुझफ्फर अली, शाद अली, शेखर कपूर, राजकुमार हिरानी, आमीर खान, विशाल भारद्वाज आणि सुहासिनी मणिरत्नम यांसारखे मान्यवर मास्टरक्लासच्या विविध सत्रांमध्ये सहभागी होतील.
यात आज दादासाहेब फाळके चित्रनगरीतर्फे श्री गणेशा आणि मुक्काम पोस्ट देवाचं घर या दोन चित्रपटांचं प्रदर्शन झालं. इफ्फी फिल्म बाजार या विभागात चित्रनगरीचं विशेष दालन सुरू आहे.