पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची परिषद झाली. पायरसी रोखण्याचे उपाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देणं आणि जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय चित्रपटांना स्थान देणं इत्यादी विषयांवर यावेळी चर्चा झाली. भारत आज संपूर्ण जगासाठी स्टुडिओ म्हणून उभा राहात असून भारताचं माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र पुढच्या १० वर्षांत ३१ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मुरुगन यांनी यावेळी व्यक्त केला. या क्षेत्राला नवे आयाम देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याचं आवाहन माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी केलं. या परिषदेत टोगो, मोरोक्को, आयर्लंड, क्यूबा, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, इस्रायल, गयाना इत्यादी देशांचे राजदूत सहभागी झाले होते.
त्यापूर्वी, इफ्फीमधल्या मास्टरक्लासेसचं उद्घाटन डॉक्टर मुरुगन आणि संजय जाजू यांच्या हस्ते झालं. प्रसिद्ध निर्माते मुझफ्फर अली यावेळी उपस्थित होते.